लहान मुलांना इंग्लिश कसे शिकवावे हा प्रश्न अनेक पालकांच्या मनात असतो. आपल्या मुलांना घरच्या घरीच इंग्लिश शिकविण्याचे उपाय पालक नेहमीच शोधत असतात. मुलांची सगळ्यात पहिली शाळा हे घर असतो आणि सगळ्यात पहिले शिक्षक हे आई आणि बाबा असतात घरी दिलेल्या योग्य मार्गदर्शनामुळेही मुलं इंग्लिश हळूहळू आणि नैसर्गिकरित्या शिकू शकतात. यासाठी योग्य पद्धत आणि पालकांचा संयम महत्त्वाचा असतो.
या लेखामध्ये मी तुम्हाला वयानुसार लहान मुलांना इंग्लिश कसे शिकवायचे, मुलांना इंग्लिश बोलण्याची आणि वाचनाची सवय कशी लावायची, तसेच मुलांना घरच्या घरी सोप्या आणि प्रभावी मार्गांनी इंग्लिश कशी शिकवता येयील पाहणार आहोत. माझा अस अनुभव आहे कि मुलांना ताण किंवा स्पर्धा न करता शिकविल्यास खेळातून आणि संवादातून लवकर शिकतात.
मुलांना इंग्लिश कधीपासून शिकवायला सुरुवात करावी?
लहान मुलांना इंग्लिश कधी शिकवायचं याचं उत्तर एकच नसतं, कारण प्रत्येक मूल वेगळ्या गतीने शिकतं. माझ्या स्वतःच्या पालकत्वाच्या अनुभवातून एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली आहे लहान वयात इंग्लिश शिकणं म्हणजे अभ्यास नाही, तर ओळख निर्माण करणं असतं. ०–२ वर्षांच्या टप्प्यावर मुलांना इंग्लिश शब्द ऐकू येणं, वेगवेगळे आवाज ओळखता येणं आणि रोजच्या गोष्टींशी ते शब्द जोडता येणं हेच पुरेसं असतं. या वयात मुलं लगेच बोलत नाहीत, पण ते ऐकत असतात आणि मनात साठवत असतात.
२–४ वर्षांच्या वयात माझ्या अनुभवात असं दिसून आलं की मुलं हळूहळू शब्द उचलायला लागतात कधी कार्टूनमधून, कधी आपण वापरलेल्या शब्दांमधून. या टप्प्यावर काही मुलं लगेच बोलतात, तर काही वेळ घेतात, आणि दोन्ही गोष्टी नॉर्मल आहेत. ४–६ वर्षांच्या वयात मात्र मुलं ऐकलेलं इंग्लिश समजून वापरायला लागतात, साधी वाक्यं जोडण्याचा प्रयत्न करतात आणि प्रश्नही विचारतात. या टप्प्यावर योग्य मार्गदर्शन मिळालं, तर इंग्लिश बोलणं मुलांसाठी नैसर्गिक सवय बनू शकतं. प्रत्येक वयात शिकवण्याची पद्धत वेगळी ठेवली, मुलांशी तुलना न करता संयमाने साथ दिली, तर इंग्लिश शिकवताना ताण येत नाही. उलट, रोजच्या छोट्या संवादातून आणि खेळातून शिकणं मुलांसाठी जास्त सोपं आणि परिणामकारक ठरतं.
वयानुसार लहान मुलांना इंग्लिश कसे शिकवायचे
लहान मुलांना इंग्लिश शिकवणं म्हणजे अभ्यासाची सुरुवात नव्हे, तर भाषेशी ओळख निर्माण करणं असतं. अनेक वेळा पालक नकळत दोन टोकांवर जातात काही जण फार लवकर बोलणं किंवा वाचनाची अपेक्षा ठेवतात, तर काही जण “आता लहान आहे” म्हणून पूर्णपणे टाळतात. दोन्ही गोष्टी मुलांसाठी गोंधळ निर्माण करू शकतात.
खरं तर इंग्लिश शिकवताना प्रश्न “कधी सुरू करायचं?” असा नसून “कशा पद्धतीने सुरू करायचं?” हा जास्त महत्त्वाचा असतो. मुलांची समज, लक्ष देण्याची क्षमता आणि भावनिक तयारी बदलत जात असते, त्यामुळे प्रत्येक टप्प्यावर तीच पद्धत वापरणं उपयोगाचं ठरत नाही. जिथे एका टप्प्यावर ऐकणं आणि पाहणं पुरेसं असतं, तिथे पुढच्या टप्प्यावर संवाद आणि सहभाग गरजेचा होतो.
योग्य वेळी योग्य पद्धत वापरली, आणि मुलांवर तुलना किंवा दबाव न आणता मार्गदर्शन केलं, तर इंग्लिश शिकणं मुलांसाठी सहज, नैसर्गिक आणि ताणमुक्त होतं. म्हणूनच पुढील भागात आपण इंग्लिश शिकवण्याचे मार्ग टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत जे पालकांना “आमच्या मुलासाठी आत्ता काय योग्य आहे?” हे ठरवायला मदत करतील.
० ते २ वर्ष्याच्या मुलांना इंग्लिश ची ओळख कशी करून द्यावी

या वयात मुलांना इंग्लिश “शिकवायचं” नसतं हे लक्षात घेतलं, तर पालकांचा अर्धा ताण तिथेच कमी होतो. ० ते २ वर्षांच्या मुलांचं मेंदू काम मुख्यतः ऐकणं, पाहणं आणि आवाज ओळखणं या गोष्टींवर केंद्रित असतं. त्यामुळे या टप्प्यावर इंग्लिश म्हणजे अक्षरं, शब्द किंवा वाक्यं पाठ करायला लावणं नाही, तर भाषेचा नैसर्गिक आवाज कानाला परिचित करून देणं इतकंच अपेक्षित असतं.
माझ्या अनुभवात, या वयात मुलं आपण बोललेलं इंग्लिश परत बोलत नसली तरी ते पूर्णपणे दुर्लक्ष करत नाहीत. उलट, ते शब्दांचे सूर, लय आणि भाव लक्षपूर्वक ऐकत असतात. उदाहरणार्थ, “Come here”, “Clap hands”, “Good job” अशा छोट्या वाक्यांचा रोजच्या कृतींमध्ये वापर केला, तर मुलांच्या मनात इंग्लिशचा एक ओळखीचा प्रवाह तयार होतो जो पुढे बोलण्यासाठी खूप उपयोगी ठरतो.
या वयात गाणी आणि rhyme-based शब्द खूप प्रभावी ठरतात, कारण गाण्यांमध्ये पुनरावृत्ती, ठराविक लय आणि सोपे शब्द असतात. इंग्लिश rhyme लावताना शब्द अचूक उच्चारले गेले नाहीत, तरी चालतात महत्त्वाचा भाग म्हणजे मुलांनी ते आनंदाने ऐकणं. तसंच, शब्द बोलताना हातवारे, चेहऱ्यावरील भाव किंवा कृती दाखवली, तर मुलांना शब्दांचा अर्थ समजायला मदत होते. उदाहरणार्थ, “Open”, “Close”, “Bye-bye” असे शब्द बोलताना कृती केली, तर शब्द आणि अर्थ आपोआप जोडले जातात.
या टप्प्यावर अनेक पालकांची चूक म्हणजे “मुलं काही बोलत नाहीत” म्हणून इंग्लिश थांबवणं. प्रत्यक्षात, हेच ते वय असतं जिथे मुलं भाषेची पायाभरणी करत असतात. इंग्रजी शब्द ऐकू येणं, वेगवेगळे आवाज ओळखणं आणि त्यांना घाबरू न लागणं हीच या वयातली खरी प्रगती आहे. इंग्लिश शिकवण्याऐवजी, जर आपण भाषेशी ओळख निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित केलं, तर पुढच्या टप्प्यावर मुलं शब्द उचलताना आणि बोलताना जास्त आत्मविश्वास दाखवतात. संयम ठेवणं आणि रोज थोडंसं, पण सातत्याने इंग्लिश वापरणं हेच या वयासाठी सर्वात प्रभावी मार्ग ठरतात.
२ ते ४ वर्ष्याच्या मुलांना इंग्लिश बोलण्याची सवय कशी लावावी

या वयात मुलं फक्त ऐकणारी न राहता प्रतिक्रिया देऊ लागतात कधी शब्दांतून, कधी हावभावातून, तर कधी अर्धवट वाक्यांतून. त्यामुळे २ ते ४ वर्षांच्या टप्प्यावर इंग्लिश शिकवताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांना बोलायला सुरक्षित वाटणं. योग्य-अयोग्य, चूक-बरोबर यापेक्षा “मी बोलू शकतो” हा आत्मविश्वास तयार होणं जास्त गरजेचं असतं.
माझ्या अनुभव सांगतो कि या वयात मुलांना इंग्लिश बोलायला लावण्यासाठी वेगळा वेळ काढण्याची गरज नसते. रोजच्या दिनचर्येतले छोटे-छोटे क्षणच खूप प्रभावी ठरतात. उदाहरणार्थ, “Wash hands”, “Drink water”, “Let’s go”, “Good morning” अशी साधी वाक्यं रोज वापरली, तर मुलं ती ऐकून, समजून आणि हळूहळू परत वापरायला लागतात. सुरुवातीला शब्द अर्धवट असतील किंवा उच्चार चुकीचा असेल, तरी ते थांबवू नये कारण तेच बोलण्याची पहिली पायरी असते.
या टप्प्यावर अनेक पालक नकळत चूक करतात मुलांनी इंग्लिशमध्ये उत्तर दिलं नाही तर लगेच मराठीत परत बोलतात. पण थोडा वेळ दिला, मुलाला विचार करण्याची संधी दिली, तर तो स्वतःहून शब्द आठवण्याचा प्रयत्न करतो. हीच प्रक्रिया इंग्लिश बोलण्याची सवय निर्माण करते.
उदाहरणार्थ, “Which color is this?” असं विचारल्यावर लगेच उत्तर न मिळालं तरी घाई न करता, बोट दाखवून किंवा पर्याय सांगून मुलाला मदत केली, तर तो हळूहळू शब्द वापरू लागतो.
लहान मुलांना इंग्लिश कसे बोलावे यासाठी खेळ आणि संवाद खूप उपयोगी ठरतात. रोल-प्ले (जसं की shop-shop, doctor-doctor), चित्रांकडे पाहून नावं सांगणं, किंवा “What is this?” सारखे सोपे प्रश्न विचारणं या सगळ्या गोष्टी मुलांना इंग्लिश बोलायला नैसर्गिकरीत्या प्रवृत्त करतात. जेव्हा इंग्लिश खेळाचा भाग बनतं, तेव्हा मुलं बोलायला घाबरत नाहीत.
गेम्स आणि toys जे मुलांना इंग्लिश शिकण्यात मदत करतात
- Flashcards: रंग, वस्तू आणि रोजच्या शब्दांसाठी साधे flashcards वापरा.
- Alphabet puzzles / foam letters: हाताने पकडता येणारे अक्षरं कौशल्य विकसित करतात आणि बोलताना त्यांचा संदर्भ येतो.
- Picture books with simple pictures: एका पानावर एकच चित्र आणि सोपा शब्द असे books मुलांना जास्त आकर्षक वाटतात.
- Interactive toys (sound-based): साधे आवाज देणारे इंग्लिश शब्द toys मुलांना लय, उच्चार आणि repetition ची ओळख करून देतात.
थोडक्यात सांगायचं झालं, तर या वयात उद्दिष्ट “फ्लुएंट इंग्लिश” नसून बोलण्याची सवय आणि आत्मविश्वास असतो. लहान मुलांना इंग्लिश बोलायला कसे शिकवावे याचं उत्तर मोठ्या पद्धतींमध्ये नसून, रोजच्या साध्या संवादात आणि पालकांच्या संयमात दडलेलं असतं. मुलांनी एक-एक शब्द वापरायला सुरुवात केली, की पुढच्या टप्प्यासाठी भक्कम पाया तयार होतो.
४–६ वर्ष्यांच्या मुलांसाठी इंग्लिश वाचन आणि शब्द ओळख कसे शिकवावे

या वयात मुलांबद्दल एक महत्त्वाची गोष्ट लक्षात येते ते फक्त ऐकणारी मुलं राहत नाहीत, तर प्रश्न विचारणारी, नक्कल करणारी आणि स्वतःहून शब्द ओळखण्याचा प्रयत्न करणारी बनतात. माझ्या पालकत्वाच्या अनुभवातून सांगायचं तर, ४–६ वर्षे हा इंग्लिश “वाचायला” लावण्याचा नव्हे, तर वाचनाची गोडी निर्माण करण्याचा काळ आहे.
अनेक पालक इथेच चुकतात. ABCD पाठ झालं, शब्द वाचता येत नाहीत म्हणून ताण देतात. पण प्रत्यक्षात, या वयात मुलांना शब्द ओळखायला शिकवणं जास्त महत्त्वाचं असतं पूर्ण वाक्य वाचणं नाही.
या टप्प्यावर चित्र पुस्तके खूप उपयोगी पडतात. शब्दाखाली चित्र असेल, तर मुलं आधी चित्र ओळखतात आणि हळूहळू त्या शब्दाकडे लक्ष जातं. उदाहरणार्थ, “Cat” हा शब्द वारंवार पाहिला, ऐकला आणि चित्राशी जोडला गेला, तर तो शब्द मुलांच्या लक्षात आपोआप राहतो. इथे शब्द किती पटकन वाचला जातो यापेक्षा, तो ओळखीचा वाटतो का हे जास्त महत्त्वाचं आहे.
Phonics ची ओळखही याच वयात नैसर्गिकरीत्या करून देता येते. पण phonics म्हणजे नियम शिकवणं नव्हे. “C for Cat”, “B for Ball” एवढंच नाही, तर “क्…अॅ…ट्” असा आवाज करून दाखवणं, आणि तो शब्द एखाद्या खेळात वापरणं ही पद्धत जास्त प्रभावी ठरते. Phonics खेळासारखं मांडलं, तर मुलं कंटाळत नाहीत; उलट, ते स्वतःहून शब्द फोडून पाहण्याचा प्रयत्न करतात.
या वयात मोठ्याने वाचन (read aloud) खूप मदत करतं. पालकांनी मुलांसमोर इंग्लिश पुस्तक वाचणं, शब्दावर बोट ठेवत वाचणं, आणि मध्येच “हा शब्द आपण कुठे ऐकला आहे?” असा साधा प्रश्न विचारणं यामुळे वाचन आणि बोलणं यांचा संबंध तयार होतो. इथे मुलांनी अचूक उच्चार केला नाही तरी चालतो. प्रयत्न करणं हेच या टप्प्यावर यशाचं लक्षण असतं.
एक गोष्ट मी ठामपणे सांगू शकतो की ४–६ वर्षांच्या मुलांसाठी इंग्लिश वाचन म्हणजे स्पर्धा नाही. काही मुलं लवकर शब्द वाचतात, काही उशिरा. पण जर शब्दांबद्दल भीती नसेल, पुस्तक हातात घ्यायला आवडत असेल, आणि इंग्लिश “आपल्यासाठी नाही” असं वाटत नसेल तर आपण योग्य मार्गावर आहोत, असंच समजावं.
लहान वयात इंग्रजी शिकण्याचे काय फायदे आहेत?

- इंग्रजी “वेगळी भाषा” न वाटता रोजच्या आयुष्याचा भाग बनते
लहानपणी मुलांनी इंग्रजी शब्द फक्त ऐकले, तरी त्यांच्या मनात ही भाषा घराबाहेरची किंवा खास प्रसंगातली राहत नाही. पुढे शाळेत इंग्रजी सुरू झाल्यावर “नवीन काहीतरी शिकतोय” असा ताण येत नाही कारण ती आधीपासून ऐकलेली असते. - उच्चार चांगले होण्यामागे अभ्यास नव्हे, कानाची सवय कारणीभूत असते
अनेक पालक विचारतात, “उच्चार इतके स्वच्छ कसे येतात?” याचं उत्तर phonics किंवा class पेक्षा जास्त, लहानपणी कानाला लागलेले शब्दांचे आवाज हे असतं. लहान वयात ऐकलेली इंग्रजी लय मेंदूत साठते आणि पुढे बोलताना आपोआप बाहेर येते. - “चूक झाली तरी चालेल” ही मानसिकता लवकर तयार होते
मोठ्या वयात इंग्रजी शिकताना मुलं आधी विचार करतात मी बरोबर बोलतोय का? लहान वयात मात्र अशी भीती नसते. इंग्रजी आधीपासून ऐकलेली असल्यामुळे मुलं प्रयत्न करायला घाबरत नाहीत, आणि हाच पुढे fluent बोलण्याचा पाया ठरतो. - शाळेत इंग्रजी सुरू झाल्यावर आत्मविश्वासात स्पष्ट फरक दिसतो
प्रत्यक्ष अनुभवातून एक गोष्ट जाणवते ज्या मुलांनी लहानपणी इंग्रजी ऐकलेली असते, ती मुलं शाळेत प्रश्न समजून घेण्यात, सूचना ऐकण्यात आणि शिक्षकांशी संवाद साधण्यात जास्त confident असतात. गुणांपेक्षा हा आत्मविश्वास जास्त महत्त्वाचा असतो. - मराठी कमी होत नाही, उलट भाषेची समज वाढते
अनेक पालकांना भीती असते की इंग्रजी शिकवलं तर मराठी मागे पडेल. प्रत्यक्षात, मुलांना दोन भाषा ऐकायला मिळाल्या की ते शब्द, अर्थ आणि संवाद यातील फरक अधिक चांगल्या प्रकारे समजून घेतात. मजबूत मराठीवर इंग्रजी बसणं जास्त नैसर्गिक होतं. - पुढे “अभ्यास” सुरू होण्याआधीच शिकण्याची सकारात्मक सवय लागते
लहान वयात इंग्रजी म्हणजे पुस्तकं, परीक्षा किंवा होमवर्क नसतं ती गाणी, गोष्टी आणि बोलण्यातून येते. त्यामुळे मुलांच्या मनात “शिकणं = ताण” अशी भावना तयार होत नाही, आणि ही सवय पुढील वर्षांमध्ये फार उपयोगी पडते.
मुलांना इंग्लिश शिकवतांना पालकांकडून होणाऱ्या सामान्य चुका

१) जास्त अपेक्षा आणि नकळत येणारा तान
अनेक पालकांच्या मनात एकच प्रश्न असतो “माझं मूल अजून इंग्लिश का बोलत नाही?”
याच विचारातून नकळत ताण सुरू होतो. रोज विचारणं, पुन्हा पुन्हा बोलायला लावणं, किंवा “बोल ना इंग्लिशमध्ये” असं म्हणणं हे आपल्याला साधं वाटतं, पण मुलांसाठी ते ताणाचं कारण ठरू शकतं.
कसं टाळाल?
- “कधी बोलणार?” हा प्रश्न बाजूला ठेवा
- बोलण्याआधी ऐकण्याचा टप्पा स्वीकारा
- प्रगतीला वेळ लागतो, हे स्वतःला आठवत रहा
२) तुलना करणे
“शेजाऱ्याचं मूल किती छान इंग्लिश बोलतं”
“त्याच्या वयात तू अजून बोलत नाहीस”
अशी तुलना अनेकदा चुकून होते हेतू चांगला असतो, पण परिणाम उलट होतो.
मुलांच्या शिकण्याची गती वेगवेगळी असते. कोणी आधी बोलतं, कोणी आधी समजून घेतं. तुलना केली की मुलाच्या मनात इंग्लिश म्हणजे स्पर्धा असल्याची भावना तयार होते.
कसं टाळाल?
- प्रत्येक मूल वेगळं आहे, हे स्वीकारा
- मुलाची तुलना दुसऱ्याशी नव्हे, त्याच्या आधीच्या प्रगतीशी करा
- “आज एक नवीन शब्द ऐकला” हीसुद्धा प्रगतीच आहे
३) प्रत्येक चूक लगेच दुरुस्त करणे
मुलं बोलायला लागली की पालक लगेच शब्द, grammar, pronunciation सुधारू लागतात.
“असं नाही, असं म्हण”
“चूक आहे”
हे वारंवार झालं की मुलं बोलणंच थांबवतात.
लहान वयात fluent इंग्लिशपेक्षा बोलण्याची हिंमत जास्त महत्त्वाची असते.
कसं टाळाल?
- मुलांनी काहीतरी बोललं, याचं आधी कौतुक करा
- चुकीचा शब्द दुरुस्त न करता योग्य वाक्य आपण वापरून दाखवा
(मुलं ते आपोआप उचलतात) - “चूक झाली तरी चालते” हा संदेश कृतीतून द्या
४) सातत्य न ठेवणे
काही दिवस इंग्लिश वापरायची, मग आठवडाभर बंद — असा pattern अनेक घरांत दिसतो.
मुलांसाठी मात्र भाषा म्हणजे सवय असते, कार्यक्रम नाही.
कसं टाळाल?
- रोज ५–१० मिनिटं पुरेशी आहेत
- ठराविक वेळ नाही, ठराविक क्षण शोधा (खेळ, जेवण, बाहेर जाताना)
- थोडंसं पण रोज हाच खरा मंत्र आहे
पालकांनी मुलांना इंग्रजी शिकवताना “शिक्षक” बनण्यापेक्षा त्यांच्या साठी एक सुरक्षित आणि आधार देणारी जागा बनणं जास्त गरजेचं आहे.
जिथे मुलं घाबरत नाहीत, तुलना होत नाही, आणि बोलण्याचा आनंद घेतात, तिथे इंग्रजी आपोआप येऊ लागते.
निष्कर्ष
लहान मुलांना इंग्लिश कसे शिकवावे हा विषय फक्त लवकर बोलणं किंवा वाचन यापुरता मर्यादित नसून, तो योग्य पद्धत, संयम आणि रोजच्या छोट्या सवयींवर आधारलेला आहे. वयानुसार ऐकणं, बोलणं आणि वाचन यावर लक्ष दिल्यास इंग्लिश शिकणं मुलांसाठी ताणमुक्त आणि नैसर्गिक होतं. अभ्यासापेक्षा संवाद, अपेक्षेपेक्षा आधार, आणि तुलना नव्हे तर प्रोत्साहन हेच खरे मार्गदर्शक ठरतात. हा लेख उपयुक्त वाटला असेल, तर तो इतर मराठी पालकांपर्यंत शेअर करा आणि अधिक अशाच मार्गदर्शक लेखांसाठी Marathi Parenting ब्लॉगला नियमित भेट द्या.
पालकांसाठी इतर महत्वाचे लेख:
वयानुसार बाळाच्या शिकण्याला खेळातून कशी मदत करावी | सोपं मार्गदर्शन
नवजात बाळांशी काय बोलावे? पालकांसाठी सोपं मार्गदर्शन
मुलांना शिस्त कशी लावावी? वयानुसार योग्य, सकारात्मक आणि प्रभावी मार्गदर्शन
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
मुलांना इंग्रजी वाचायला कसे शिकवावे?
लहान मुलांना इंग्रजी वाचायला शिकवताना आधी अक्षरं पाठ न करता शब्द ओळख आणि आवाज यावर भर द्यावा. चित्रांसोबतचे शब्द, phonics-based गाणी, आणि रोज थोडा वेळ मोठ्यांनी मोठ्याने वाचून दाखवणं उपयुक्त ठरतं. वाचन हा आनंदाचा अनुभव राहू द्यावा.
मुलांना इंग्रजी कसे शिकवायचे?
मुलांना इंग्रजी शिकवताना अभ्यासापेक्षा रोजच्या संवादाचा उपयोग करावा. दैनंदिन वाक्यं, खेळ, गाणी आणि गोष्टी यामधून इंग्रजी ऐकायला मिळालं की मुलं हळूहळू समजून घेऊ लागतात. सातत्य आणि संयम ठेवणं हेच सर्वात महत्त्वाचं असतं.
इंग्रजी शिकवण्याच्या ५ पद्धती कोणत्या आहेत?
इंग्रजी शिकवण्यासाठी पाच सोप्या पद्धती प्रभावी ठरतात:
१. रोजच्या संभाषणात इंग्रजी शब्द वापरणे
२. गाणी आणि rhymes
३. चित्र पुस्तके व flashcards
४. खेळातून शिकवणे
५. चुका न दुरुस्त करता प्रोत्साहन देणे
या पद्धती ताण न देता शिकायला मदत करतात.
इंग्रजी शिकवण्याचे ४ कौशल्य कोणते?
इंग्रजी शिकवताना चार कौशल्यांचा समतोल महत्त्वाचा असतो: ऐकणे, बोलणे, वाचणे आणि लिहिणे. लहान वयात ऐकणे आणि बोलणे आधी येतं, तर वाचन आणि लेखन हळूहळू विकसित होतं. योग्य वयात योग्य कौशल्यावर लक्ष दिलं तर शिकणं सहज होतं.
