मुलांना वाचायला कसे शिकवायचे? सोप्या आणि प्रभावी पद्धती

आई-वडील घरी मुलाला वाचायला शिकवत आहेत आणि मुलगा पुस्तक वाचण्याचा सराव करत आहे

मुलांना वाचायला कसे शिकवायचे? हा प्रश्न मला सुद्धा पडत होता आणि मला माहित आहे कि हा प्रश्न प्रत्येक आई आणि वडिलांच्या मनात येणारा आहे. मूल शाळेत जायला लागलीत कि त्यांचा गृहपाठ सुरू होतो पण अक्षरे जोडताना मुले अडखळायला लागतात, शब्द वाचतांना थांबतात किंवा बहुतेक वेळेस तर वाचनापासून दूर पळायला सुरुवात करतात. तेव्हा पालकांना काळजी वाटते “आपले मूल मागे तर पडत नाही ना?”

खरं तर मुलांना वाचायला शिकवणे म्हणजे फक्त अक्षरांची ओळख करून देणे नाही. हा एक टप्प्याटप्प्याने होणारा प्रवास आहे अक्षर ओळख, ध्वनी समज, शब्द जोडणे, अर्थ समजून वाचणे आणि हळूहळू आत्मविश्वास वाढवणे. योग्य पद्धत वापरली नाही तर मुलांना वाचन कठीण वाटू शकते पण योग्य मार्गदर्शन मिळाले तर तेच मूल आनंदाने पुस्तक हातात घेऊ लागते.

या लेखात मी तुम्हाला स्पष्टपणे सांगणार आहे कि:

  • मुलांना वाचायला शिकवण्याची योग्य सुरुवात कुठून करावी
  • कोणत्या व्यावहारिक आणि घरच्या घरी करता येणाऱ्या पद्धती खरोखर काम करतात
  • मुलांना वाचनात अडचणी का येतात आणि त्या कशा सोडवायच्या
  • आणि सर्वात महत्त्वाचे वाचनाची आवड नैसर्गिकरित्या कशी निर्माण करायची

जर तुम्हालाही तुमच्या मुलाने आत्मविश्वासाने, आनंदाने आणि सहज वाचायला शिकावे असे वाटत असेल, तर हा लेख तुमच्यासाठी आहे.

मुलांनी कधी वाचायला सुरुवात करावी?

अनेक पालकांच्या मनात हा प्रश्न असतो की मुलांनी नेमके कधी वाचायला सुरुवात करावी? काही पालकांना वाटते की जितक्या लवकर मुलांना वाचायला शिकवले तितके चांगले. पण प्रत्यक्षात वाचन ही अशी कौशल्य आहे जी हळूहळू विकसित होते. त्यामुळे प्रत्येक मुलासाठी सुरुवात करण्याची वेळ थोडी वेगळी असू शकते.

सामान्यतः मुलांची भाषा समज, शब्दसंग्रह आणि अक्षरांची ओळख तयार झाल्यावर वाचन शिकणे सोपे होते. बहुतेक मुले ४ ते ६ वर्षांच्या दरम्यान हळूहळू शब्द वाचायला शिकू लागतात. या वयात त्यांना अक्षरे ओळखता येतात, अक्षरांचे आवाज समजायला लागतात आणि लहान शब्द जोडण्याचा प्रयत्न करता येतो.

तथापि, वाचनाची खरी तयारी त्यापूर्वीच सुरू होते. लहान वयात गोष्टी ऐकणे, चित्रपुस्तके पाहणे, गाणी म्हणणे आणि अक्षरांशी ओळख करून घेणे या गोष्टी मुलांच्या भाषा विकासासाठी खूप महत्त्वाच्या असतात. या सवयींमुळे मुलांना पुढे वाचायला शिकणे अधिक सोपे आणि आनंददायी वाटते.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक मूल आपल्या गतीने शिकतात. त्यामुळे इतर मुलांशी तुलना करण्याऐवजी पालकांनी मुलाच्या आवडी, तयारी आणि समज लक्षात घेऊन वाचनाची सुरुवात करणे अधिक योग्य ठरते. योग्य वातावरण, थोडा सराव आणि पालकांचे प्रोत्साहन मिळाले तर मूल हळूहळू आत्मविश्वासाने वाचायला शिकतात.

मुलांना वाचायला शिकवण्यासाठी ७ सोप्या पद्धती

मुलांना वाचायला शिकवताना योग्य पद्धती वापरणे खूप महत्त्वाचे असते. योग्य मार्गदर्शन मिळाले तर मूल अक्षरे ओळखणे, शब्द जोडणे आणि अर्थ समजून वाचणे हे टप्प्याटप्प्याने सहज शिकू शकतात. मी तुम्हाला खाली दिलेल्या काही सोप्या आणि उपयुक्त पद्धती तुम्ही घरच्या घरी वापरू शकतात. या पद्धतींच्या मदतीने मुलांची वाचन कौशल्ये हळूहळू विकसित होते आणि त्यांचा आत्मविश्वासही वाढतो.

1. अक्षरांची ओळख खेळातून करून द्या

आई मुलाला खेळाच्या माध्यमातून अक्षरांची ओळख करून देत आहे आणि मूल घरातील वस्तूंशी अक्षरे जोडून शिकत आहे

लहान मुलांना अक्षरे शिकवताना सुरुवातीलाच “बसून अभ्यास कर” असे सांगितले तर त्यांना ते अवघड आणि कंटाळवाणे वाटू शकते. म्हणून सुरुवातीला अक्षरे खेळ, संवाद आणि दैनंदिन गोष्टींमधून ओळख करून देणे अधिक परिणामकारक ठरते. जेव्हा मूल अक्षराला एखाद्या ओळखीच्या वस्तूशी किंवा अनुभवाशी जोडते, तेव्हा ते अक्षर लक्षात ठेवणे त्याला सोपे जाते.

जसे की घरात दिसणाऱ्या साध्या वस्तूंमधून अक्षरे ओळख करून देता येतात. “क” म्हटले की कप, “ब” म्हटले की बॉल किंवा “च” म्हटले की चप्पल अशा प्रकारे अक्षर आणि वस्तू यांचा संबंध जोडून सांगितल्यास मुलाच्या मनात त्या अक्षराची स्पष्ट प्रतिमा तयार होते. ही पद्धत लहान मुलांसाठी विशेष प्रभावी ठरते, कारण ते प्रत्यक्ष पाहिलेल्या गोष्टींमधून जास्त पटकन शिकतात.

याशिवाय मी माझ्या मुलासोबत अक्षरांवर आधारित खेळ खेळत होती त्याचा तुम्हाला अनुभव सांगते. मी माझ्या मुलाला एखादे अक्षर सांगायची आणि त्याला घरात त्या अक्षराने सुरू होणारी वस्तू शोधायला लावायची. हा एक साधा खेळ असला तरी त्यामुळे मुलांचे निरीक्षण कौशल्य वाढते आणि अक्षरांची ओळखही अधिक पक्की होते.

अशा प्रकारे अक्षरे खेळातून शिकवली तर मुलाला शिकणे हे ओझे वाटत नाही. उलट त्याला उत्सुकता वाटते आणि मूल स्वतःहून नवीन अक्षरे ओळखण्याचा प्रयत्न करायला लागतात. पुढे शब्द वाचायला शिकण्यासाठी हीच अक्षर ओळख मजबूत पाया तयार करते.

२. ध्वनी पद्धत वापरा

आई मुलाला अक्षरांचा ध्वनी समजावून सांगत आहे आणि मूल अक्षरांचे आवाज जोडून शब्द वाचण्याचा सराव करत आहे

अनेक वेळा मुले अक्षरे ओळखतात, पण शब्द वाचताना अडखळतात. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांना अक्षरांचा ध्वनी (आवाज) समजलेला नसतो. म्हणूनच मुलांना वाचायला शिकवताना Phonics म्हणजे अक्षरांचा आवाज समजावून सांगणे खूप महत्त्वाचे असते.

उदाहरणार्थ, मुलाला फक्त “क” हे अक्षर ओळखून देणे पुरेसे नाही. त्याला “क” चा आवाज कसा येतो आणि तो आवाज शब्दात कसा वापरला जातो हेही समजले पाहिजे. जसे “क” पासून कमळ, कावळा, काकडी असे शब्द सांगितले तर मुलाला त्या अक्षराचा ध्वनी आणि शब्द यांचा संबंध समजायला लागतो.

तसेच दोन किंवा तीन अक्षरे एकत्र आल्यावर शब्द कसा तयार होतो हेही हळूहळू दाखवता येते. उदाहरणार्थ “क” + “म” = कम. अशा प्रकारे अक्षरांचे आवाज जोडून शब्द तयार होताना मुलाला दाखवल्यास त्याला वाचनाची पद्धत समजायला लागते.

ही पद्धत वापरताना सुरुवातीला लहान आणि सोपे शब्द निवडणे महत्त्वाचे असते. मुलाला शब्द हळूहळू उच्चारून वाचायला सांगितले तर त्याचा आत्मविश्वास वाढतो आणि तो पुढे स्वतः नवीन शब्द वाचण्याचा प्रयत्न करू लागतो.

अक्षर ओळख आणि ध्वनी यांचा योग्य सराव झाल्यावर मुलाला शब्द वाचणे अधिक सहज वाटू लागते. त्यामुळे मुलांना वाचायला शिकवताना Phonics पद्धतीचा वापर करणे हा एक प्रभावी आणि उपयुक्त मार्ग ठरतो.

3. दररोज 10 मिनिटे मोठ्याने वाचा

आई मुलासोबत बसून मोठ्याने गोष्टीचे पुस्तक वाचत आहे आणि मूल लक्ष देऊन ऐकत आहे

मुलांना वाचायला शिकवण्याचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग म्हणजे दररोज थोडा वेळ मोठ्याने वाचून दाखवणे. अनेक पालक मुलाला स्वतः वाचायला सांगतात, पण सुरुवातीला मुलाने आधी कोणीतरी वाचताना ऐकणे खूप महत्त्वाचे असते. यामुळे त्याला शब्द कसे उच्चारायचे, वाक्य कसे वाचायचे आणि गोष्ट कशी समजून घ्यायची हे हळूहळू समजते.

दररोज 10 मिनिटे एखादे छोटे गोष्टीचे पुस्तक किंवा चित्रपुस्तक मुलासोबत बसून वाचा. वाचताना फक्त शब्द वाचून थांबू नका, तर मध्येच मुलाला प्रश्न विचारा. उदाहरणार्थ, “इथे कोण दिसत आहे?”, “आता पुढे काय होईल?” असे साधे प्रश्न विचारल्यास मुलाचे लक्ष गोष्टीत राहते आणि तो वाचनात सहभागी होतो.

वाचन करताना चित्रांकडे लक्ष वेधणेही उपयोगी ठरते. चित्र आणि शब्द यांचा संबंध जोडल्याने मुलाला गोष्टीचा अर्थ समजायला मदत होते. काही दिवसांनी मुलाला एखादा सोपा शब्द किंवा छोटी ओळ स्वतः वाचण्यास प्रोत्साहन द्या.

ही छोटी सवय नियमित ठेवली तर मुलांना पुस्तकांची भीती वाटत नाही. उलट त्यांना गोष्टी ऐकायला आणि नंतर स्वतः वाचून पाहायला उत्सुकता वाटू लागते. हळूहळू हीच सवय मुलांच्या वाचन कौशल्याला मजबूत बनवते.

4. चित्रपुस्तकांचा वापर करा

आई मुलासोबत चित्रपुस्तक वाचताना आणि चित्रांकडे बोट दाखवून गोष्ट समजावून सांगताना

लहान मुलांना सुरुवातीला लांब मजकूर वाचणे कठीण वाटू शकते. म्हणूनच वाचनाची सुरुवात चित्रपुस्तकांपासून (Picture Books) करणे खूप उपयुक्त ठरते. चित्रे मुलांचे लक्ष पटकन वेधून घेतात आणि गोष्ट समजून घेणे त्यांना सोपे जाते.

चित्रपुस्तकांमध्ये सहसा मोठी चित्रे आणि कमी शब्द असतात. त्यामुळे मूल आधी चित्र पाहते, त्यातून गोष्टीचा अंदाज लावते आणि मग शब्द वाचण्याचा प्रयत्न करते. अशा प्रकारे चित्र आणि शब्द यांचा संबंध जोडला जातो, ज्यामुळे मुलाची समज आणि वाचन कौशल्य दोन्ही विकसित होतात.

पालकांनी पुस्तक वाचताना चित्रांकडे बोट दाखवून सांगणे, “हे कोण आहे?”, “तो काय करत आहे?” असे प्रश्न विचारणे उपयोगी ठरते. यामुळे मूल फक्त ऐकत नाही तर गोष्टीमध्ये सहभागी होते. काही वेळाने मूल स्वतः चित्र पाहून गोष्ट सांगण्याचाही प्रयत्न करू लागते.

अशा प्रकारे चित्रपुस्तकांचा वापर केल्याने मुलांना वाचनाची सुरुवात सोपी आणि मनोरंजक वाटते. पुढे हळूहळू अधिक शब्द असलेल्या पुस्तकांकडे जाणेही त्यांना सहज शक्य होते.

5. घरात वाचनाचे वातावरण तयार करा

आई आणि मूल घरातील वाचनाच्या कोपऱ्यात एकत्र पुस्तक वाचताना आणि घरात वाचनाचे सकारात्मक वातावरण तयार झाल्याचे दृश्य

मुलांना वाचायला शिकवताना फक्त पुस्तक देणे पुरेसे नसते. घरात वाचनाला महत्त्व दिले जाते का, हेही मुलांच्या सवयींवर मोठा परिणाम करते. जर मुलाला घरात पुस्तके दिसत असतील, पालक कधीमधी वाचताना दिसत असतील आणि गोष्टी ऐकण्याची वेळ असते, तर मुलामध्ये नैसर्गिकपणे वाचनाची आवड तयार होऊ लागते.

यासाठी घरात छोटासा पुस्तकांचा कोपरा तयार करू शकता. काही चित्रपुस्तके, गोष्टींची पुस्तके किंवा मुलांच्या वयाला योग्य अशी पुस्तके एका ठिकाणी ठेवली तर मूल त्यांना सहज हाताळू शकते. पुस्तके दिसत राहिल्यामुळे मुलांना त्यांच्याबद्दल उत्सुकता वाटते आणि ते स्वतः ती उघडून पाहण्याचा प्रयत्न करतात.

तसेच दिवसात एखादा ठरलेला वेळ “वाचनाचा वेळ” म्हणून ठेवणेही उपयोगी ठरते. त्या वेळी टीव्ही किंवा मोबाइल बाजूला ठेवून काही मिनिटे पुस्तकासोबत घालवल्यास मुलांना हा वेळ विशेष वाटते. हळूहळू ही सवय तयार झाली की मूल स्वतःहून पुस्तक उघडून वाचण्याचा प्रयत्न करू लागतात.

अशा प्रकारे घरात सकारात्मक वाचन वातावरण तयार केल्यास मुलांना वाचन ही जबरदस्तीची गोष्ट वाटत नाही, तर ती एक आनंददायी सवय बनते.

6. जबरदस्ती करू नका

मुलगा शांतपणे पुस्तक वाचत असताना आई त्याच्यासाठी दूधाचा ग्लास घेऊन येत आहे आणि घरात प्रोत्साहन देणारे वातावरण दिसत आहे

मुलांना वाचायला शिकवताना अनेक पालक अनवधानाने एक मोठी चूक करतात जबरदस्ती करणे. मूल लगेच वाचू शकत नाही किंवा शब्द चुकतो तेव्हा त्याला वारंवार दटावणे किंवा दबाव टाकणे यामुळे मुलाच्या मनात वाचनाबद्दल भीती निर्माण होऊ शकते. एकदा वाचन म्हणजे ताण किंवा शिक्षा वाटू लागली, की मूल पुस्तकांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करते.

लहान मुलांना शिकण्यासाठी सुरक्षित आणि प्रोत्साहन देणारे वातावरण आवश्यक असते. जर मूल एखादा शब्द चुकीचा वाचले, तर लगेच दुरुस्त करून रागावण्याऐवजी शांतपणे योग्य उच्चार सांगावा. कधी कधी मुलाला थोडा वेळ द्यावा आणि नंतर पुन्हा प्रयत्न करू द्यावा. या प्रक्रियेत पालकांचा संयम खूप महत्त्वाचा असतो.

तसेच प्रत्येक मुलाची शिकण्याची गती वेगळी असते हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. काही मुले पटकन वाचायला शिकतात, तर काहींना थोडा जास्त सराव लागतो. त्यामुळे इतर मुलांशी तुलना करण्याऐवजी मुलाच्या छोट्या प्रगतीचे कौतुक करणे अधिक प्रभावी ठरते.

जेव्हा मुलाला असे वाटते की चूक झाली तरी चालेल आणि पुन्हा प्रयत्न करता येईल, तेव्हा तो अधिक आत्मविश्वासाने वाचनाचा सराव करू लागतो. त्यामुळे वाचन शिकवताना दबावापेक्षा प्रोत्साहन अधिक महत्त्वाचे असते.

7. मुलाचे कौतुक करा

मुलगा पुस्तक वाचत असताना आई त्याचे कौतुक करत आहे आणि त्याला प्रोत्साहन देत आहे अशी घरातील सकारात्मक वातावरण दाखवणारी चित्रात्मक दृश्य.

मुलांना वाचायला शिकताना प्रोत्साहन आणि कौतुक खूप महत्त्वाचे असते. जेव्हा मूल एखादा शब्द स्वतः वाचण्याचा प्रयत्न करतात किंवा नवीन अक्षर ओळखतात, तेव्हा त्यांचे कौतुक केल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे मूल पुढेही वाचनाचा सराव करण्यास उत्सुक असतात.

कौतुक म्हणजे नेहमी मोठे बक्षीस देणे आवश्यक नाही. कधी कधी “छान वाचले”, “तू खूप चांगला प्रयत्न केला” अशा साध्या शब्दांनीही मुलाला प्रोत्साहन मिळते. अशा सकारात्मक प्रतिसादामुळे मुलाला वाटते की त्याचा प्रयत्न महत्त्वाचा आहे.

तसेच सुरुवातीच्या टप्प्यात मूल शब्द अडखळत वाचू शकते किंवा काही चुका करू शकतात. त्या वेळी फक्त चुका दाखवण्याऐवजी त्याने केलेल्या योग्य प्रयत्नांकडे लक्ष देणे अधिक प्रभावी ठरते. त्यामुळे मुलांमध्ये शिकण्याची उत्सुकता टिकून राहते.

लहान-लहान यशाचे कौतुक केल्याने मुलांचा आत्मविश्वास वाढतो आणि हळूहळू ते अधिक सहजपणे वाचायला शिकतात.

मुलांना वाचतांना येणाऱ्या सामान्य अडचणी

मुलांना वाचायला शिकताना सुरुवातीला काही अडचणी येणे अगदी सामान्य आहे. अनेक पालकांना वाटते की मूल वाचायला शिकत नाही, पण प्रत्यक्षात ते शिकण्याच्या प्रक्रियेचा एक भाग असतो. काही मुलांना अक्षरे ओळखायला वेळ लागतो, काहींना शब्द जोडताना अडचण येते, तर काही मुलांचे लक्ष पटकन विचलित होते.

या अडचणी समजून घेतल्या तर पालकांना मुलांना योग्य प्रकारे मदत करता येते. खाली मी तुम्हाला मुलांना वाचतांना सर्वात जास्त येणाऱ्या काही सामान्य अडचणी देत आहे.

1. अक्षरे गोंधळणे

लहान मुलांना सुरुवातीला काही अक्षरे एकसारखी वाटू शकतात. उदाहरणार्थ ब-द, प-फ किंवा इंग्रजीमध्ये b-d सारखी अक्षरे मुले गोंधळतात. यामुळे शब्द वाचताना ते चुकीचा उच्चार करू शकतात किंवा थांबतात.

ही अडचण कमी करण्यासाठी अक्षरे वेगवेगळ्या उदाहरणांमधून आणि पुनरावृत्तीने दाखवणे उपयुक्त ठरते. अक्षरांसोबत चित्रे, शब्द किंवा वस्तू जोडल्यास मुलाला त्या अक्षराची वेगळी ओळख लक्षात राहते.

2. लक्ष कमी लागणे

लहान मुलांचे लक्ष नैसर्गिकपणे कमी वेळ टिकते. त्यामुळे जास्त वेळ बसून वाचायला सांगितले तर ते लवकर कंटाळतात. अनेक वेळा पालकांना वाटते की मूल वाचायला इच्छुक नाही, पण प्रत्यक्षात त्याची एकाग्रता अजून विकसित होत असते.

अशा वेळी वाचनाचा वेळ कमी ठेवणे, मध्ये खेळ किंवा प्रश्न विचारणे आणि मजेदार पद्धतीने शिकवणे अधिक उपयोगी ठरते.

3. हळू वाचणे

सुरुवातीला मुले शब्द एक-एक अक्षर जोडून वाचतात, त्यामुळे त्यांचा वेग कमी असतो. हे पूर्णपणे सामान्य आहे. सराव वाढल्यावर मुलाला शब्द लगेच ओळखता येऊ लागतात आणि वाचनाचा वेग आपोआप वाढतो.

मुलाला घाई करायला सांगण्यापेक्षा त्याला शांतपणे शब्द पूर्ण वाचू द्या. सातत्याने सराव केल्यास हळूहळू सुधारणा दिसू लागते.

4. स्क्रीन टाइम जास्त असणे

मोबाइल, टीव्ही किंवा टॅबलेटवर जास्त वेळ घालवल्यास मुलांची पुस्तके वाचण्याची सवय कमी होऊ शकते. स्क्रीनवरील वेगवान दृश्यांमुळे पुस्तक वाचणे मुलांना कमी आकर्षक वाटू शकते.

म्हणून शक्य असल्यास स्क्रीन टाइम मर्यादित ठेवणे आणि त्याऐवजी गोष्टी ऐकणे, चित्रपुस्तके पाहणे किंवा एकत्र वाचन करणे अशा सवयी तयार करणे अधिक फायदेशीर ठरते.

वाचनाची आवड वाढवण्यासाठी मजेदार Activity Ideas

मुलांना वाचायला शिकवणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच वाचनाची आवड निर्माण करणे देखील महत्त्वाचे आहे. जर वाचन मजेदार आणि उत्सुकता वाढवणारा अनुभव वाटला, तर मुले स्वतःहून पुस्तकांकडे वळू लागतात. त्यामुळे कधी कधी अभ्यासासारखे वाचन करण्याऐवजी छोट्या activity च्या माध्यमातून वाचनाची सवय तयार करणे अधिक प्रभावी ठरते.

खाली काही सोप्या आणि घरच्या घरी करता येणाऱ्या activity दिल्या आहेत ज्या मुलांना वाचनात सहभागी होण्यास मदत करतात.

1. “आजची गोष्ट” वेळ

दररोज ठराविक वेळी “आजची गोष्ट” अशी छोटी सवय तयार करा. झोपण्यापूर्वी किंवा संध्याकाळी 10–15 मिनिटे एखादी गोष्ट वाचा. काही दिवसांनी मुलाला एखादा छोटा भाग स्वतः वाचायला सांगू शकता.

ही सवय नियमित झाली की मुलाला गोष्टींची उत्सुकता वाटू लागते आणि तो पुढे काय होईल हे जाणून घेण्यासाठी स्वतः वाचण्याचा प्रयत्न करतो.

2. “गोष्ट पूर्ण करा” खेळ

हा खेळ मुलांच्या कल्पनाशक्ती आणि वाचन दोन्ही वाढवतो. तुम्ही एखादी गोष्ट सुरू करा आणि मध्येच थांबा. नंतर मुलाला विचारा “आता पुढे काय होईल?”

मूल कधी पुस्तकात पाहून उत्तर शोधते, तर कधी स्वतः गोष्ट तयार करण्याचा प्रयत्न करते. अशा प्रकारे वाचन हा एक मजेदार खेळ बनतो.

3. वाचन चॅलेंज

मुलांना छोट्या reading challenge द्या. उदाहरणार्थ:

  • या आठवड्यात 3 छोटी गोष्टी वाचायच्या
  • दररोज 5 नवीन शब्द ओळखायचे

चॅलेंज पूर्ण झाल्यावर छोटा स्टीकर, कौतुक किंवा छोटी ट्रीट देऊ शकता. यामुळे मुलामध्ये उत्साह आणि सातत्य टिकून राहते.

4. कुटुंबासोबत वाचन वेळ

कधी कधी संपूर्ण कुटुंबाने 10–15 मिनिटे एकत्र वाचन करण्याचा वेळ ठेवू शकता. त्या वेळी प्रत्येकजण आपापले पुस्तक वाचतो किंवा एकत्र गोष्ट वाचली जाते.

मुलांना जेव्हा पालक आणि घरातील इतर सदस्यही वाचताना दिसतात, तेव्हा वाचन ही चांगली आणि नैसर्गिक सवय आहे असे त्यांना वाटते. त्यामुळे मुलांमध्ये वाचनाबद्दल सकारात्मक दृष्टीकोन तयार होतो.

निष्कर्ष

मुलांना वाचायला शिकवणे ही एक स्पर्धा नाही आणि ती घाईघाईने पूर्ण करायची गोष्टही नाही. प्रत्येक मूल वेगळे असतात आणि त्यांची शिकण्याची गतीही वेगळी असते. काही मुले पटकन अक्षरे आणि शब्द ओळखायला लागतात, तर काहींना थोडा अधिक वेळ आणि सराव लागतो. त्यामुळे पालकांनी तुलना किंवा दबाव टाळून मुलाला शांतपणे शिकण्याची संधी देणे महत्त्वाचे आहे.

मुलांमध्ये वाचनाची सवय तयार होण्यासाठी संयम, प्रेम आणि सातत्य या तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. दररोज थोडा वेळ वाचनासाठी देणे, मुलाच्या छोट्या प्रयत्नांचे कौतुक करणे आणि पुस्तकांबद्दल सकारात्मक वातावरण तयार करणे यामुळे हळूहळू मुलामध्ये आत्मविश्वास वाढतो.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुलांना वाचनाला भीती किंवा ताण म्हणून नव्हे, तर आनंद आणि शोधाचा अनुभव म्हणून पाहायला शिकले पाहिजे. योग्य मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळाल्यास प्रत्येक मूल आपल्या गतीने वाचायला शिकू शकते आणि पुढे ज्ञानाच्या नव्या जगाशी जोडले जाऊ शकते.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

1. मुलांना वाचायला शिकवण्याची योग्य वय कोणते आहे?

सामान्यतः मुले ४ ते ६ वर्षांच्या दरम्यान वाचायला शिकण्यास सुरुवात करतात. या वयात त्यांना अक्षरे ओळखणे, शब्दांचे आवाज समजणे आणि छोटे शब्द वाचणे सोपे जाऊ लागते. मात्र प्रत्येक मुलाची शिकण्याची गती वेगळी असते, त्यामुळे काही मुले थोडे लवकर किंवा उशिरा वाचायला शिकू शकतात.

2. मुलांना वाचायला शिकवण्याची सुरुवात कशी करावी?

सुरुवातीला मुलांना अक्षरांची ओळख, अक्षरांचे ध्वनी (Phonics) आणि सोपे शब्द शिकवण्यापासून सुरुवात करावी. तसेच चित्रपुस्तके, गोष्टी आणि छोट्या खेळांच्या माध्यमातून वाचनाची ओळख करून दिल्यास मुलांना शिकणे अधिक सोपे आणि मजेदार वाटते.

3. मूल वाचताना शब्द का गोंधळते?

लहान मुलांना सुरुवातीला काही अक्षरे एकसारखी वाटू शकतात किंवा शब्द जोडताना अडचण येऊ शकते. हे पूर्णपणे सामान्य आहे. नियमित सराव, अक्षरांची पुनरावृत्ती आणि शांतपणे मार्गदर्शन केल्यास ही अडचण हळूहळू कमी होते.

4. मुलाला वाचनाची आवड कशी लावावी?

मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी दररोज गोष्ट वाचणे, चित्रपुस्तके वापरणे आणि मजेदार वाचन activity करणे उपयुक्त ठरते. तसेच पालक स्वतः वाचताना दिसले तर मुलांवर त्याचा सकारात्मक प्रभाव पडतो.

5. मुलाला वाचायला शिकताना किती वेळ सराव करायला हवा?

लहान मुलांसाठी दररोज 10 ते 15 मिनिटांचा वाचन सराव पुरेसा असतो. जास्त वेळ बसवण्यापेक्षा थोड्या वेळाचा पण नियमित सराव अधिक प्रभावी ठरतो.

6. मुलाला वाचायला शिकवताना पालकांनी कोणत्या चुका टाळाव्यात?

मुलावर जास्त दबाव टाकणे, सतत चुका दाखवणे किंवा इतर मुलांशी तुलना करणे या गोष्टी टाळल्या पाहिजेत. त्याऐवजी संयम ठेवून प्रोत्साहन दिल्यास मुलाचा आत्मविश्वास वाढतो आणि तो अधिक उत्साहाने वाचन शिकतो.

Scroll to Top