मुलांचा राग कसा नियंत्रित करायचा | पालकांसाठी प्रभावी उपाय

रागावलेलं मूल आणि त्रस्त आई मुलांचा राग समजून घेण्याची गरज

मुलांचा राग कसा नियंत्रित करायचा? आज अनेक पालक या एकाच प्रश्नाने त्रस्त आहेत. मुले छोट्या-छोट्या गोष्टींवर ओरडतात, वस्तू फेकायला लागतात, हट्ट धरून रडतात आणि अश्या वेळेस आपण मुलांचा राग शांत करण्यासाठी काय करावे हेच समजत नाही. मुलांमध्ये राग येणे हे फक्त हट्ट किंवा वाईट सवय म्हणून बघायला लागतो परंतु हे मुलांच्या आत असलेल्या अस्वस्थतेचा तो एक संकेत असतो.

बर्‍याच वेळा आपण नकळत राग थांबवण्यासाठी ओरडणं, धमकावणं किंवा शिक्षा देणं हा मार्ग निवडतो. पण त्यामुळे मुलांचा राग तात्पुरता शांत झाला तरी ती पुन्हा अधिक तीव्र स्वरूपात दिसून येते. मुलांचा राग समजून न घेता तो दडपण्याचा प्रयत्न केल्यास, मूल भावनिकदृष्ट्या अधिक गोंधळतात.

म्हणूनच मी या लेखात मुलांचा राग कसा नियंत्रित करायचा हे माझ्या रोजच्या अनुभवांमधून समजूवून सांगणार आहे. मुलांना राग का येतो आणि मुलांमध्ये राग वाढवणाऱ्या सवयी कोणत्या आहेत आणि मुलांचा राग नियंत्रित करण्यासाठी उपाय बघू.

लहान मुलांना राग का येतो?

लहान मुलांचा राग हा अचानक निर्माण होत नाही. तो मेंदूच्या विकासाशी, भावनिक परिपक्वतेशी आणि त्यांच्या आजूबाजूच्या वातावरणाशी थेट जोडलेला असतो. विज्ञानानुसार, लहान मुलांचा मेंदू अजून पूर्ण विकसित झालेला नसतो विशेषतः भावनांवर नियंत्रण ठेवणारा भाग (prefrontal cortex). त्यामुळे मुलांना आपली भावना शब्दांत व्यक्त करणं कठीण जातं, आणि त्या भावना अनेकदा रागाच्या रूपात बाहेर पडतात.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे, लहान मुलांना राग येणं हे नैसर्गिक आहे. मोठ्यांप्रमाणे “हे करू नये”, “थांब” किंवा “शांत राहा” असं स्वतःला समजावण्याची क्षमता त्यांच्याकडे नसते. त्यामुळे जेव्हा त्यांच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत, त्यांना समजलं जात नाही किंवा परिस्थिती त्यांच्या नियंत्रणाबाहेर जाते तेव्हा राग हा त्यांचा सहज प्रतिसाद ठरतो.

याच कारणामुळे मुलांचा राग हा “वाईट वागणूक” नसून, भावना व्यक्त करण्याची त्यांची मर्यादित पद्धत आहे. पालकांनी हा मुद्दा समजून घेतला, तर राग दडपण्याऐवजी तो योग्य पद्धतीने हाताळणं सोपं होईल.

मुलांमध्ये राग येण्याची मुख्य कारणे

मुलांमध्ये राग येण्याची मुख्य कारणे दर्शवणारा इन्फोग्राफिक
  • भूक किंवा झोप न होणं
    लहान मुलांचा मेंदू आणि शरीर अजून विकसित होत असतं. भूक लागलेली किंवा पुरेशी झोप न झालेली असताना मुलांना स्वतःवर नियंत्रण ठेवणं कठीण जातं, त्यामुळे चिडचिड आणि राग पटकन दिसतो.
  • स्वतःला व्यक्त करता न येणं
    मुलांना जे वाटतं ते शब्दांत सांगता न आलं, की ती अस्वस्थता रागाच्या रूपात बाहेर येते. “मला नकोय”, “मला हवंय” हे स्पष्ट न सांगता येणं ही मोठी अडचण असते.
  • जास्त स्क्रीन टाइम
    सतत स्क्रीन पाहिल्यामुळे मुलांचा मेंदू overstimulated होतो. अचानक मोबाईल किंवा टीव्ही बंद केला की, त्यांना भावनिक धक्का बसतो आणि तो रागाच्या स्वरूपात दिसतो.
  • सतत तुलना किंवा टोमणे
    “तो असं करतो, तू का नाही?” अशा तुलना मुलांच्या आत्मविश्वासावर परिणाम करतात. स्वतःला कमी समजल्यामुळे आतून निराशा वाढते आणि ती राग म्हणून बाहेर पडते.
  • पालकांच लक्ष न मिळणं
    पालक सतत व्यस्त असतील, तर मूल रागाच्या माध्यमातून लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतात. राग ही त्यांची “मला बघा” अशी हाक असते.
  • बदल (शाळा, नवीन बाळ, घर बदल)
    लहान मुलांना बदल सहज स्वीकारता येत नाहीत. ओळखीची सुरक्षितता बदलली की, भीती आणि अस्वस्थता वाढते आणि त्यातून राग दिसून येतो.

मुलांचा राग कसा नियंत्रित करायचा?

मुलांचा राग नियंत्रित करणं म्हणजे तो लगेच थांबवणं नव्हे, तर त्या रागामागचं कारण समजून घेणं आणि मुलांना स्वतःच्या भावना सुरक्षितपणे व्यक्त करता येतील असा आधार देणं आहे. प्रत्येक मूल वेगळं असतं, त्यामुळे एकच उपाय सर्वांसाठी चालेल असं नाही. पण काही मूलभूत, अनुभवाधारित पद्धती अवलंबल्या तर मुलांचा राग हळूहळू कमी होतो आणि त्यांची भावनिक समज वाढते. पुढील उपाय पालकांना रोजच्या आयुष्यात सहज वापरता येतील असे आहेत.

१) मुलांना राग आल्यास रागाच्या वेळी पालकांनी स्वतः शांत राहा

रागावलेलं मूल आणि शांतपणे जवळ बसलेली आई

मुलांना राग आला की त्या क्षणी पालकांनी स्वतः शांत राहणं हे सगळ्यात प्रभावी पाऊल असतं. कारण रागाच्या वेळी मुलांचा मेंदू भावनांच्या ताब्यात असतो; त्या अवस्थेत समजावून सांगणं किंवा ओरडणं उपयोगाचं ठरत नाही. उलट पालकांचा वाढलेला आवाज मुलाच्या रागाला अधिक तीव्र करतो.

माझा मुलगा देवेश जेव्हा या वयात होता, तेव्हा राग आला की तो जमिनीवर बसून रडायचा आणि खेळणी फेकायचा. त्या वेळी मी बोलणं थांबवून फक्त त्याच्याजवळ शांतपणे बसायची, हळूच त्याचा हात धरायची किंवा मिठीत घ्यायची. काही सेकंदांतच त्याचा श्वास स्थिर व्हायचा.

तेव्हा मला उमगलं की शब्दांपेक्षा माझी शांत देहबोलीच त्याला “सगळं ठीक आहे” असा संदेश देत होती. पालकांची ही शांत उपस्थिती मुलाला सुरक्षित वाटू देते आणि राग ओसरल्यानंतरच तो ऐकायला व समजून घ्यायला तयार होतो.

2) राग व्यक्त करण्यासाठी सुरक्षित पर्याय द्या

वडील मुलाला राग सुरक्षित पद्धतीने व्यक्त कसा करायचा हे चित्रांच्या माध्यमातून समजावत आहेत

मुलांचा राग थांबवण्यापेक्षा त्यांना राग योग्य पद्धतीने व्यक्त करता येईल असे मार्ग देणं जास्त महत्त्वाचं आहे. राग ही नैसर्गिक भावना आहे; पण ती दाबली गेली तर ती ओरडणं, वस्तू फेकणं किंवा मारामारीच्या रूपात बाहेर पडते. म्हणून मुलांना “राग येऊ नको” असं सांगण्याऐवजी “राग आला तर काय करायचं?” हे शिकवणं आवश्यक आहे.

मुलांना सुरक्षित पर्याय द्या जसे कि कागदावर स्वतःच्या भावना चित्रांच्या माध्यमातून काढायला लावणं, मुलांना राग आला की खोल श्वास घेऊन हळूहळू सोडण्याचा सराव कारायला लावा, १ ते १० मोजणं, शांत संगीत ऐकणं किंवा थोडा वेळ एकटं शांत बसणं. माझ्या मुलाला राग शब्दांत मांडता येत नाही, म्हणून मी त्याला “आज तुला काय त्रास झाला?” हे लिहायला सांगत होते आणि जेव्हा तो अस करायचा काही वेळा नंतरच त्याचा राग कमी झालेला दिसायचा.

हळूहळू मुलांना हे कळायला लागतं की राग व्यक्त करणं चुकीचं नाही, पण तो कसा व्यक्त करायचा हे महत्त्वाचं आहे. असे सुरक्षित मार्ग दिल्याने मुलं स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवायला शिकतात आणि पुढे रागामुळे होणाऱ्या वागणुकीत लक्षणीय बदल दिसून येतो.

३) मुलांच्या रागाला नाव द्या (Emotion Labeling)

आई मुलाला त्याच्या रागाच्या भावनेला नाव देत समजावून सांगत आहे आणि त्याला भावनिक सुरक्षितता देत आहे

मुलांना त्यांच्या भावनांना नाव द्यायला शिकवणं हे मुलांचे राग नियंत्रणासाठी खूप प्रभावी गोष्ट आहे. अनेक वेळा मुलांना काय वाटतंय हे समजत नसल्यामुळे ते रडतात, ओरडतात किंवा रागाच्या रूपात प्रतिक्रिया देतात. अशा वेळी आपण स्वतः हून मुलांच्या वतीने भावना शब्दांत मांडून दाखवणं उपयोगी ठरतं.

उदाहरणार्थ, “तुला राग आलाय कारण तुझं खेळणं तुटलंय, बरोबर?” किंवा “मी नाही म्हणाली म्हणून तुला वाईट वाटतंय, म्हणून तू ओरडतोयस.” अशा वाक्यांमुळे मुलाला आपली भावना ओळखता येते आणि ती व्यक्त करण्यासाठी शब्द मिळतात.

यामुळे मुलांना माझी भावना समजली आहे असा विश्वास वाटतो, तो अधिक सुरक्षित वाटतो आणि त्यांचा राग हळूहळू कमी होऊ लागतो.

४) मुलांना राग आलेला असतांना उपदेश देन टाळा

राग आलेल्या मुलाजवळ शांतपणे बसून वडील त्याला शब्द न देता भावनिक साथ देत आहेत

मुलांना राग आल्यावर त्यांना उपदेश करणं किंवा योग्य-अयोग्य समजावून सांगणं बहुतेक वेळा निष्फळ ठरतं. कारण त्या क्षणी मुलांचा मेंदू ऐकण्याच्या अवस्थेत नसतो; तो भावना हाताळण्यात गुंतलेला असतो. अशा वेळी दिलेला उपदेश मुलापर्यंत पोहोचत नाही, उलट त्याला अधिक चिडचिड किंवा विरोधाची भावना निर्माण होते.

रागाच्या क्षणी आपण मुलांना “असं करू नकोस”, “एवढ्यावर रडतोस का?”, “चांगली मुलं असं वागत नाहीत” अशी वाक्ये अस सांगायला लागतो परंतु त्यावेळेस मुलांना यांचा काही परिणाम होत नाही, तर त्यांची भावना त्यांना नाकारल्यासारखी वाटायला लागते. त्यामुळे त्यांना अस वाटत की मला कोणी समजूत घेत नाही.

म्हणून राग शांत होईपर्यंत फक्त साथ द्या, शब्द कमी ठेवा आणि परिस्थिती स्थिर होऊ द्या. मुलं शांत झाल्यावरच त्यांच्याशी काय चुकलं, अश्या परस्तीतिथित पुढच्या वेळी काय करता येईल याबद्दल बोलणं चांगल असते. योग्य वेळेला दिलेला थोडासा संवादच मुलांच्या खऱ्या अर्थाने शिकवणे आहे.

५) मुलांची ठरलेली दिनचर्या ठेवा

वडील आणि मूल घरात शांत वातावरणात ठरलेल्या दिनचर्येबद्दल संवाद साधताना, मुलाला सुरक्षित वाटत असलेला क्षण

मुलांच्या आयुष्यात अनिश्चितता जास्त असेल, तर त्याचा थेट परिणाम त्यांच्या रागावर दिसतो. पुढे काय होणार आहे याची कल्पना नसेल, तर मुलं अस्वस्थ होतात आणि लहानसहान गोष्टींवरही चिडचिड, रडणं किंवा राग व्यक्त करतात.

झोपायची वेळ, खाण्याची वेळ आणि स्क्रीन टाइम यासारख्या गोष्टी शक्य तितक्या ठरलेल्या असणं मुलांसाठी फार महत्त्वाचं असतं. रोज वेळ बदलली, नियम बदलले तर मुलांना सुरक्षित वाटत नाही आणि ते नियंत्रणासाठी रागाचा वापर करतात.

ठरलेली दिनचर्या म्हणजे मुलांसाठी भावनिक सुरक्षितता. काय अपेक्षित आहे हे माहीत असलं की मुलं अधिक शांत राहतात, सहकार्य करतात आणि रागाच्या प्रसंगांची तीव्रता आपोआप कमी होते.

६) “Time-Out” नाही, “Time-In” वापरा

वडील रागावलेल्या मुलाजवळ शांतपणे बसलेले, घरात सुरक्षित आणि आधार देणाऱ्या वातावरणात ‘टाइम-इन’चा क्षण दाखवणारे दृश्य

राग आला की मुलांना एकटं खोलीत पाठवणं किंवा दूर बसायला सांगणं अनेकदा उलट परिणाम करतं. अशा वेळी मुलांना “मी चुकीचा आहे” किंवा “माझ्या भावना कोणी समजूत घेत नाहीत” असं वाटू शकतं, ज्यामुळे राग कमी होण्याऐवजी आत दडपला जातो.

त्याऐवजी “Time-In” वापरा. मूल शांत होईपर्यंत त्यांच्याजवळ बसा, त्यांना बोलायचं नसेल तर काही न बोलता फक्त उपस्थित रहा. तुमची शांत देहबोली आणि साथ मुलांना सुरक्षिततेची जाणीव करून देते.

नंतर शांत झाल्यावर एवढंच सांगा “राग आला तरी मी तुझ्यासोबत आहे.”
यामुळे मुलं राग दडपायला शिकत नाहीत, तर ते सुरक्षितपणे हाताळायला शिकतात आणि तुमच्यावरचा त्यांचा भावनिक विश्वास अधिक मजबूत होतो.

७) मुलांना राग येण्याबद्दल शिकवा

आई शांतपणे मुलाला रागाबद्दल समजावून सांगताना, मुलाला स्वतःच्या भावनांची जाणीव होत असलेला क्षण

मुलांना राग येणं चुकीचं नाही, पण ते का रागावतात आणि राग आल्यावर शरीर-मनात काय घडतं हे त्यांना समजत नाही. म्हणून राग आल्यावर थांबवण्याऐवजी, शांत वेळेत मुलांना रागाबद्दल शिकवणं फार महत्त्वाचं असतं.

जस आपण मुलांना सोप्या शब्दांत सांगता येते की “राग आला की आपल्या शरीरात उष्णता वाढते, श्वास जलद होतो आणि डोकं गोंधळतं.” अशा प्रकारे भावना शरीराशी जोडून सांगितल्या की मुलांना स्वतःतील बदल ओळखता येतात.

हळूहळू मुलं हे संकेत ओळखायला शिकतात “आता मला राग येतोय” आणि तो फार वाढण्याआधी थांबवण्याचे मार्ग स्वीकारतात. रागाबद्दल शिकवणं म्हणजे भावना दाबायला सांगणं नव्हे, तर त्या समजून घेऊन नियंत्रित करायला शिकवणं होय.

केव्हा मुलांच्या रागासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा?

मुलांचा राग हा वाढीचा भाग असू शकतो, पण काही प्रसंगी तो दुर्लक्ष करण्यासारखा नसतो. पालकांनी “हे वयानुसार आहे” असं म्हणत सतत दुर्लक्ष करण्याऐवजी, खालील संकेतांकडे गंभीरपणे पाहणं गरजेचं आहे.

जर मुलांचा राग खूप तीव्र किंवा हिंसक होत असेल उदा. वस्तू फेकणं, मारणं, चावणं आणि आठवड्यांनुवारी प्रयत्न करूनही त्यात सुधारणा दिसत नसेल, तर तज्ज्ञांचा सल्ला घेणं योग्य ठरतं.

तसंच, घरात आणि शाळेत दोन्हीकडे एकसारखी समस्या दिसत असेल, किंवा मुलं स्वतःला किंवा इतरांना इजा पोहोचवत असेल, तर हे स्पष्ट संकेत आहेत की केवळ पालकत्व उपायांपेक्षा व्यावसायिक मदतीची गरज आहे.

तज्ज्ञांचा सल्ला घेणं म्हणजे पालक अपयशी ठरले असा अर्थ नाही; उलट, मुलाच्या भावनिक सुरक्षिततेसाठी घेतलेला तो जबाबदार आणि काळजीपूर्वक निर्णय असतो.

निष्कर्ष

मुलांचा राग कसा नियंत्रित करायचा याबद्दल या ब्लॉग पोस्टमध्ये आपण हे स्पष्टपणे पाहिलं की राग ही मुलांची चूक नसून, ती एक भावना आहे जिला समजून घेण्याची आणि योग्य मार्गदर्शनाची गरज असते. या लेखात आपण पालकांनी रागाच्या वेळी स्वतः शांत कसं राहावं, मुलांच्या भावनांना नाव कसं द्यावं, राग व्यक्त करण्यासाठी सुरक्षित पर्याय कसे द्यावेत, उपदेश टाळून योग्य वेळेला संवाद कसा साधावा, ठरलेली दिनचर्या का महत्त्वाची आहे आणि “Time-Out” ऐवजी “Time-In” का अधिक परिणामकारक ठरतो हे समजून घेतलं.

या सगळ्या उपायांचा उद्देश मुलांचा राग लगेच थांबवणं नाही, तर मुलांना राग समजून घेता आणि हाताळता यावा हा आहे. जेव्हा मुलांना त्यांच्या भावना सुरक्षित वाटतात, तेव्हा तो हळूहळू ओरडणं, वस्तू फेकणं किंवा हट्ट करण्याऐवजी शब्दांत स्वतःला व्यक्त करायला सुरुवात करतात. पालकांसाठी हे उपाय रोजच्या आयुष्यात सहज वापरता येण्यासारखे आहेत आणि ते अपराधीपणाऐवजी आत्मविश्वास देतात.

शेवटी, प्रत्येक मूल वेगळं असतं आणि प्रत्येक पालक परफेक्ट असण्याची गरज नाही. पण या लेखामधील मार्गदर्शन वापरून तुम्ही तुमच्या मुलांसाठी एक भावनिकदृष्ट्या सुरक्षित वातावरण तयार करू शकता जिथे राग दाबला जात नाही, तर समजून घेऊन हळूहळू नियंत्रित केला जातो. हेच खरं यश आहे, मुलांचा राग कसा नियंत्रित करायचा याचं.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न:

  1. मुलांवर रागावणे सामान्य आहे का?

    हो, कधीमधी राग येणं पालकांसाठी मानवी आणि सामान्य आहे. पण राग वारंवार ओरडण्यात किंवा कठोर वागण्यात बदलत असेल, तर त्यावर काम करणं गरजेचं आहे. राग येणं चालतं, पण तो कसा व्यक्त होतो हे महत्त्वाचं असतं.

  2. ओरडल्याने मुलांच्या मनावर काय परिणाम होतो?

    सतत ओरडल्याने मुलं घाबरट होऊ शकतात, आत्मविश्वास कमी होतो आणि पालकांशी भावनिक अंतर वाढतं. काही मुलं शांत होतात, तर काही अधिक हट्टी किंवा आक्रमक बनतात. म्हणजेच ओरडणं तात्पुरतं थांबवू शकतं, पण शिकवत नाही.

  3. रागाच्या वेळी शिक्षा द्यावी का?

    रागाच्या क्षणी शिक्षा देणं टाळावं. त्या वेळी मूल शिकण्याच्या अवस्थेत नसतं. आधी मूल शांत होऊ द्या, नंतर योग्य वेळेला शांतपणे काय चुकलं आणि पुढे काय करता येईल याबद्दल बोला.

  4. मुलं मोठेपणी हे सगळं आठवतात का?

    हो, मुलांना नेमके शब्द आठवत नसले तरी त्या क्षणी कसं वाटलं हे आठवतं. पालकांची शांत साथ, समजून घेणं आणि सुरक्षितता हीच आठवण पुढे त्यांच्या भावनिक आरोग्यावर परिणाम करते.

Scroll to Top